breaking-newsTOP Newsपुणे

नवीन टर्मिनलला ‘झाले मोकळे आकाश’; १४ जुलैपासून प्रवासी सेवेला सुरुवात

पुणे : तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल १४ जुलैपासून प्रवाशांसाठी खुले होत आहे. पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. १४) दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे नवीन टर्मिनलवरील पहिले उड्डाण होणार आहे. या वेळी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रवाशांना बोर्डिंग पास दिले जाणार आहेत.

पहिल्या दिवशी नवीन टर्मिनलवरून सात विमानांचे उड्डाण होणार आहे. सुरुवातीचे काही दिवस प्रायोगिक तत्त्वावर एअर इंडिया व एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांची वाहतूक नवीन टर्मिनलवरून होणार आहे.

हेही वाचा –  मुरलीधर मोहोळ यांची पुणे मेट्रो कार्यालयाला भेट

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ मार्चला झाले. मात्र त्यानंतर ‘बिकास’ची परवानगी नाही म्हणून, तर कधी ‘सीआयएसएफ’च्या अतिरिक्त जवानांची तुकडी दाखल झाली नाही म्हणून सेवेला विलंब झाला. मात्र, मुरलीधर मोहोळ यांनी हवाई मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाला गती आली. नवीन टर्मिनलसाठी ‘सीआयएसएफ’ची नियुक्ती झाल्यावर आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. केवळ इमिग्रेशन डेस्कचे स्थलांतर होणे बाकी आहे. दोन दिवसांत हेदेखील काम पूर्ण होणार आहे.

विमानतळ प्रशासनाने सुरुवातीचे काही दिवस पहिल्या टप्यात केवळ दोनच कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यानंतर आणखी दोन विमान कंपन्यांना परवानगी दिली जाणार आहे. एअर इंडिया व एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांची दिवसभरात १६ उड्डाणे होतात. १६ उड्डाणे व १६ लँडिंग अशा मिळून रोज ३२ विमानांची नवीन टर्मिनलवरून वाहतूक सुरू होणार आहे.

नवीन टर्मिनलवर पहिल्यादांच अत्याधुनिक अशी इन लाइन बॅगेज सिस्टीम बसविण्यात आली. ही मशिन अमेरिकेतून पुण्यात दाखल झाली. मागच्या महिन्यात अमेरिकेतून या मशिनची पाहणी करण्यासाठी एक पथक दाखल झाले. त्यांनी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सहमती दर्शवली. दोन मशिन बसविण्यात आले आहेत. या यंत्रणेमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होण्यास मदत होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button