Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

मुरलीधर मोहोळ यांची पुणे मेट्रो कार्यालयाला भेट

पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी पुणे मेट्रो कार्यालयाला भेट दिली. या बैठकीसाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.

आढावा बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मान्यवरांना प्रकल्पाचा आढावा सादर केला. यावेळी महामेट्रोचे संचालक कार्य अतुल गाडगीळ, संचालक संचालन आणि प्रणाली विनोद अग्रवाल, कार्यकारी संचालक, प्रशासन व जनसंपर्क डॉ. हेमंत सोनवणे आणि महा मेट्रो पुणेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – ’लाडक्या बहिणीं’साठी महापालिका यंत्रणा कामाला

अधिक वारंवारितेसह फीडर सेवेची तरतूद, स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्ग, वनाझ ते चांदणी चौक मेट्रो मार्ग आणि रामवाडी ते वाघोली मार्गिकेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पुणे  विमानतळावर फीडर सेवांसाठी प्रवेश आणि इतरत्र फीडर सेवांची तरतूद यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले. याव्यतिरिक्त भविष्यात पुणे व पिंपरी चिंचवड शहरात नवीन मेट्रो मार्गांची आवश्यकता भासणार आहे. त्यावर देखील चर्चा झाली. पुणे मेट्रो सध्याच्या फीडर बस सेवेमधून दररोज 5000 प्रवासी प्रवास करत आहेत. अधिकच्या फीडर बससेवेमुळे ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहरात मेट्रोचे अधिकाधिक मार्ग बांधण्याची गरज आहे. तसेच मेट्रो फिडर सेवा देखील बळकट करण्याची आवश्यकता आहे. पुणे मेट्रोच्या नवीन मार्गाच्या प्रकल्प अहवालांचा पाठपुरावा करण्यात येऊन लवकरात लवकर त्यांना मान्यता देण्यात मी कायम प्रयत्नशील राहील.”

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, “पुणे मेट्रो प्रकल्प चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे, आणि आम्ही कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि पुण्यातील नागरिकांसाठी प्रवासाचा एकूण अनुभव सुधारण्यासाठी कटिबद्ध आहोत. पुणे मेट्रोला सर्वांसाठी पसंतीचे परिवहन साधन बनवणे हे आमचे ध्येय आहे. पुणे मेट्रो आपल्या प्रवाश्याना पर्यावरण पूरक, स्वस्त, कार्यक्षम आणि आरामदायी प्रवास देत आहे.”

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button