लग्नास नकार देणाऱ्या विवाहीत प्रियकराचा खून; प्रेयसी अटकेत
![Murder of a married lover who refuses to marry; Beloved arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/murder.jpg)
पुणे | लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने विवाहीत प्रियकराचा गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) चिंचवड येथे सायंकाळी उघडकीस आली.पैगंबर गुलाब मुजावर (वय 35, रा. एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या विवाहित प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या प्रेयसीला (वय 29, रा. साने चौक, चिखली) पोलिसांनी अटक केली आहे. मयत पैगंबर याची पत्नी (वय 32) यांनी शनिवारी (दि. 14) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैगंबर आणि महिला आरोपी हे दोघेजण पूर्वी एकाच ठिकाणी कामाला होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. फिर्यादी यांचे पती हे आरोपी महिलेला भेटायला जात नाहीत. तसेच त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरून त्यांचे महिला आरोपीशी वाद होत होते.
महिला आरोपीने पैगंबर याला शुक्रवारी चिंचवड स्टेशन येथील व्हाईट हाऊस लॉजमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. रात्री दहा वाजताच्या सुमारास तिने पैगंबर बेशुद्ध पडल्याचे लॉज मधील कर्मचाऱ्यांना सांगितले.
त्यांनी पैगंबर यास त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संशयावरून पोलिसांनी पैगंबर याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.