breaking-newsताज्या घडामोडीपुणे

 पूरस्थितीवरून पालिका आणि पाटबंधारे विभाग आमने-सामने…

पुणे : खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळी जादा पाणी सोडल्याची माहिती महापालिकेला देण्यात आली होती, असा दावा पाटबंधारे विभागाने केला, तर महापालिका म्हणते, की आम्हाला कळविले त्यापेक्षा जादा पाणी सोडले. त्यामुळे पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून आता पालिका आणि पाटबंधारे विभाग आमनेसामने आले असून, महापालिका आणि जलसंपदा विभागात जुंपल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता महापालिका खरी बोलते, की पाटबंधारे विभाग खरे बोलतो, असा प्रश्‍न पुणेकरांना पडला आहे.

खडकवासला समूहातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणाच्या वरील भागात २५ जुलै २०२४ रोजी पहाटे २ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत अतिवृष्टी झाली. या २४ तासांत ११८ ते ४५३.५ मिलिमीटर इतकी अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे खडकवासला धरण ते पुणे शहर या भागात १०८ ते १६७.५ मिलिमीटर पाऊस झाला व तो विक्रमी स्वरुपाचा होता.

त्यामुळे खडकवासला धरणात, तसेच शहरातील नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. या अचानक आलेल्या पावसाने धरणातून विसर्ग करणे आवश्यक होते. त्यानुसार नियोजन करून नदीत पाणी सोडण्यात आले, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

जलसंपदा विभागाने यासंदर्भात सतत संनियंत्रण करून पाणी सोडण्याची पूर्वसूचना २२ जुलै २०२४ पासून पुणे महापालिका नियंत्रण कक्ष व जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला दिली होती.

हेही वाचा  –  ‘हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाच्या प्रमोशनला ‘द सलमान खान’ हा अस्सल पठाण’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

जलसंपदा विभाग महापालिका व जिल्हा प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय राखण्यात आला आहे, असा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे. मग एवढा समन्वय असूनही पाणी सोडणार असल्याची पूर्वकल्पना काही तास आधी नागरिकांपर्यंत का पोहोचली नाही, असा सवाल नागरिक करत आहेत.

जलसंपदा खाते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. ते सातत्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. मान्सूनपूर्व तयारीची बैठक मे- जून महिन्यात घेण्यात येते. या वेळी धरणांची स्थिती, दरवाजांची तपासणी, पाणी सोडताना घ्यावयाची दक्षता, विसर्गाची पूर्वकल्पना विविध विभागांना देणे आदींच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जातात.

मात्र, यावेळी अधिकाऱ्यांनी योग्य कार्यपद्धतीचा अवलंब केला नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस उपमुख्यमंत्री फडणवीस दाखविणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button