संघ घोषाचा समग्र इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर येईल; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय घोष संग्रहालयाचे उद्घाटन
![Mohan Bhagwat said that the museum will bring the complete history of Sangh Ghosh to the new generation.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Mohan-Bhagwat-2-780x470.jpg)
पुणे | योग्य गोष्टी समाजापुढे मांडल्या गेल्या नाहीत, तर अयोग्य गोष्टी समाजापुढे येतात. या पार्श्वभूमीवर संघाच्या घोषाचा समग्र इतिहास एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या घोष अभिलेखागाराचे महत्त्व खूप मोठे आहे. अभिलेखागारामुळे घोषाचा योग्य इतिहास नव्या पिढीसमोर येईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय घोष संग्रहालयाचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. संघाच्या पुण्यातील ‘मोतीबाग’ कार्यालयात घोष संग्रहालय आणि अभिलेखागार (अर्काइव) हा प्रकल्प साकारला असून संघाच्या घोषासंबंधीची विस्तृत माहिती आणि वाद्ये येथे संग्रहित करण्यात आली आहेत. घोषासंबंधीचे ग्रंथ, पुस्तके, लेख आणि विविध प्रकारची सामग्री येथे मांडण्यात आली आहे. घोष विषयाच्या अभ्यासकांना तसेच या विषयातील तज्ज्ञांना येथे संशोधन तसेच अध्ययनही करता येणार आहे.
हेही वाचा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली बोगद्याजवळ अपघातात बिबट्याचा मृत्यू
संघाच्या घोष विभागाचा इतिहास नव्या पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळात घोष विभाग कसा होता आणि तो कसा विकसित होत गेला याची माहिती एकाच ठिकाणी संग्रहित असणे आवश्यक होते. हे काम येथील अभिलेखागारामुळे झाले आहे, असे डॉ. भागवत म्हणाले.
प्रांगणीय संगीताची परंपरा भारतातून लुप्त झाली होती. हे प्रांगणीय संगीत भारतीय संगीताच्या दालनात पुन्हा संघामुळेच आले. प्रांगणीय किंवा मैदानी संगीताचे पुनरुज्जीवन ही संघाच्या घोषाची विशेषता आहे, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.
अभिलेखागार प्रमुख मोरेश्वर गद्रे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. संघाच्या पश्चिम क्षेत्राचे शारीरिक शिक्षण प्रमुख सुनील देसाई यांची यावेळी प्रमुख उपस्थती होती. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले.
आवश्यक सर्व गोष्टी या अभिलेखागारात संग्रहित झाल्या आहेत. सर्व प्रकारची अचूक, सार्वत्रिक आणि अधिकृत अशी माहिती इथे सर्वप्रकारे उपलब्ध होईल, असे हे अभिलेखागार व्हावे.
– डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, रा. स्व. संघ.