मिशन विधानसभा निवडणूक: कोथरुडकरांच्या साथीने चंद्रकांत पाटील गुरूवारी भरणार उमेदवारी अर्ज
आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्येने सहभागी होण्याचे पाटील यांचे आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Sachin-Tapkir-2-8-780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठीची भारतीय जनता पार्टीची पहिली यादी रविवारी जाहीर झाली. या यादीत भाजपाच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. यादी जाहीर झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २४ ऑक्टोबरचा मुहूर्त निवडला आहे. यावेळी आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा – पिंपरी विधानसभेतून महायुतीचा उमेदवार आण्णा बनसोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, माझे मायबाप कोथरुडकर यांच्या आशीर्वादामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी कोथरुडकरांच्या साथीने पाटील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. तुमच्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करायला अवश्य या, अशी नम्र विनंती यावेळी पाटील यांनी केली आहे.
गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड येथे आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्येने सहभागी व्हा, असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.