पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशव्यांचे नाव देण्याची मेधा कुलकर्णींची मागणी
![Medha Kulkarni's demand to name Pune railway station after Bajirao Peshwa](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/IMG-20210821-WA0090.jpg)
पुणे -पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि पुणे मेट्रो स्थानकाला श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची नावे द्यावीत अशी मागणी पेशवे यांचे वारसदार आणि भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे.
पुणे महापालिका थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि ब्राम्हण महासंघाच्या वतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ३३१ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी ही नावे देण्याची मागणी केली.तसेच मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील शनिवारवाड्याची दुरवस्था झाली असून त्याच्या दुरुस्ती साठी राज्य आणि केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा आणि परिसतील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत अशी मागणी केली.
यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शनिवारवाडा येथील बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उत्तर हिंदुस्थानात दरारा निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे हे ४८ हुन अधिक लढाया जिंकलेले जगातील एकमेव सेनापती होते. खरे तर शनिवारवाडा हा मराठयांच्या पराक्रमाची प्रेरणा देत असून त्याकाळी मराठ्यांनीच पानिपतमध्ये रक्त सांडले होते.