मळवली आणि कार्ला परिसरामध्ये बंगल्यामध्ये अडकले
राहत्या बंगल्याला पुराचा वेढा, ३० पर्यटक अडकलेले, रेस्क्यू टीमकडून सुटका
![Malwali, Karla, Premises, Bungalow, Stuck, Flood, Siege, Rescue, Team, Rescue,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/pune-1-2-780x470.jpg)
पुणे : गेल्या चार दिवसांपासून लोणावळा आणि परिसरामध्ये तुफान पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. या भागात काही पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी, पर्यटनासाठी आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे या भागात पाणी साचलं. येथील घरांभोवती पुराच्या पाण्याचा वेढा घातला. याच पुराच्या पाण्यात काही पर्यटक अडकले होते. मळवली आणि कार्ला परिसरामध्ये बंगल्यामध्ये अडकलेल्या ३० पर्यटकांची रेस्क्यू टीमने सुटका केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून मावळ तालुक्यामध्ये तुफान पाऊस होत आहे. त्यातच मळवली परिसर हा निसर्गाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटकांची इथे मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी बाहेरून आलेल्या पर्यटकांसाठी बंगल्यांची सोय केलेली आहे. या भागामध्ये मुंबई आणि पुण्यातील काही पर्यटक पर्यटनासाठी आले होते. मात्र या परिसरामध्ये आज सकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे या बंगल्यांच्या बाजूने पाणीच पाणी झालं. मळवली येथे असलेल्या बंगल्यांमध्ये जवळपास २३ पर्यटक अडकले होते. तर कार्ला येथे असलेल्या बंगल्यामध्ये सात पर्यटक अडकले होते.
याबाबत रेस्क्यू टीमला माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत या बंगल्यांमध्ये अडकलेल्या पर्यटकांना रेस्क्यू करत सुखरूप बाहेर काढले आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग टीमने या पर्यटकांना रेस्क्यू केलं आहे. शिवदुर्ग मित्रचे सुनील गायकवाड यांनी या रेस्क्यूबाबत माहिती दिली आहे.
बंगल्याच्या बाहेर ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्याची कल्पना देखील बंगल्यामध्ये असलेल्या पर्यटकांना नव्हती. मात्र ज्यावेळी बाहेर फिरण्यासाठी निघाले त्यावेळी बंगल्याच्या आजूबाजूला पाणीच पाणी साचल्याचं दिसलं. त्यामुळे या पर्यटकांची एकच धांदल उडाली. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी, पोलिसांनी रेस्क्यू टीमला माहिती दिली.
त्यानंतर हालचाली सुरू होऊन रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत या संपूर्ण ३० पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. लोणावळा परिसरामध्ये सध्या पावसाचा जोर वाढत असून पर्यटकांनी फिरायला येताना काळजीपूर्वक यावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.