सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; संशयीत पोलिसांच्या ताब्यात, दोघांकडून महत्वाची माहिती प्राप्त

पुणे : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी अपहरण करुण खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती मिळाले आहेत. दरम्यान हडपसर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी सुमारे डझनभर संशयीत आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यातील दोघांकडून महत्वाची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे अपहरण आणि खूनाचे गुढ उकलण्यास मदत होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
या खून प्रकरणानंतर राज्यात खळबळ माजली होती. याप्रकरणी काही राजकीय प्रतिक्रीयाही उमटण्यास सुरवात झाली होती. पोलिसांनी खूनाचे प्रकरण गांभीर्याने घेत गुन्हे शाखेचे पाचही युनिटची पथके मागावर पाठवली आहेत.. तसेच परिमंडळ पाचमधील सर्व पोलीस ठाण्यांनाही धागेदोरे शोधण्याचे आदेश दिले आहेत. खुद्द पोलीस आयुक्त मागील दोन दिवस हडपसर पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. तर अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) ही तपास प्रक्रियेत कार्यरत आहेत. तांत्रीक धागेदोरे शोधण्याचे कामही वेगाने सुरु होते.
हेही वाचा – मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी!
दरम्यान परिमंडळ पाचचे उपायुक्त आर.राजा यांनी सांगितले की, पोलिसांच्या विविध पथकांनी संशयीत आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अद्यापही ठोस अशी काही माहिती मिळाली नाही. मात्र आम्ही मिळालेल्या माहितीची पडताळणी करत आहोत. वाघ यांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन त्यांनी संशय असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदनाचा ॲडव्हांस अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तर प्रत्यक्षात शरीरावर डोके आणि पोटामध्ये दोन जखमा दिसत आहेत.
या प्रकरणानंतर टिळेकर यांनी पुणे पोलिसांवर विश्वास दाखवत घटनेचे राजकारण न करता पोलिसांची बाजू समजावून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलीस काही तासांतच याचा सुगावा लावतील, सध्या आमचे कुटूंब खुप दुखात आहे..
आमदाराचा मामा असो किंवा सर्वसाधारण कुटूंबातील व्यक्ती. प्रत्येकाला आपल्या कुटूंबात अशी घटना घडल्यावर आघात होतो. त्यावेळेस राजकारण न करता पोलिसांची बाजू समजावून घेणे आवश्यक आहे. त्यांना आमचा परिवार पुर्ण सहकार्य करतोय, त्यांच्यावर आमची कोणतीही शंका नाही. पोलीस खुप चांगल्या पध्दतीने काम करत आहेत.




