‘पीएमआरडीए’च्या परवडणाऱ्या घरांसाठी१५ डिसेंबरला लॉटरीची सोडत
![Lottery draw for affordable houses of PMRDA on 15th December](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/building-1-780x470.jpg)
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) कार्यालयामार्फत नागरिकांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारण्यात येत आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत संपली आहे.
पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गट प्रवर्गातील ७९३ सदनिका आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील ३१ सदनिका तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील आर्थिक दुर्बल घटक (वन आरके) प्रवर्गातील ३६६ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटातील (वन बीएचके) प्रवर्गातील ४१४ सदनिकांचा असा हा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प आहे. पेठ क्र. १२ येथील आर्थिक दुर्बल घटक (वन बीएचके) प्रवर्गासाठी एकूण ३१६ लाभार्थींनी, अल्प उत्पन्न गट (टु बीएचके) प्रवर्गासाठी एकूण २६२ लाभार्थींनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली आहे. तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील आर्थिक दुर्बल घटक (वन आरके) गटासाठी एकूण ३७ लाभार्थींनी, आर्थिक दुर्बल घटक (वन बीएकचे) प्रवर्गासाठी एकूण १५५ लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली आहे.
या नोंदणीनुसारची प्रारूप यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहे. या यादीबाबत काही हरकत असल्यास संबंधितांनी पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयाशी संपर्क करावा. अंतिम प्रारूप यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लॉटरीची सोडत १५ डिसेंबरला पीएमआरडीएच्या कार्यालयात पार पडणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएच्या प्रशासन विभागाचे सह आयुक्त बन्सी गवळी यांनी दिली.