पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-77-1-780x470.jpg)
पुणे : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अनेक महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्र देण्यात आला आहे. आता आजपासून पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात या योजनेचा शुभारंभ होणार आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा आजपासून शुभारंभ होत आहे. आज शनिवारी 17 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रिडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. पुण्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होत असल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – ना अर्ज, ना कागदपत्रे; तरी लाडक्या बहिणीचा निधी भावाच्या खात्यात जमा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात आज शुभारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुणे शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. या बॅनरवर वचनपूर्ती सोहळा असे लिहिण्यात आले आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री अदिती तटकरे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. पुण्यातील स्वारगेट चौकात देखील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्याची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.
राज्यातील १५ हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्यातील ५ लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे सध्या महिलांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.