ताज्या घडामोडीपुणे

राज्यात पुन्हा थंडी अवतरणार; अनेक वर्षांनी दीर्घकाळ गारठा

पुणे | राज्याच्या बहुतांश भागातील किमान तापमानात वाढ झाली असल्याने सध्या गारवा कमी झाला असला, तरी दोन दिवसांनंतर तापमानात घट होऊन पुन्हा थंडी अवतरण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे.

यंदा जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू झालेली थंडी सलग दहा दिवस राज्यात कायम राहिली. पावसाळी वातावरणाचा अडथळा न येता गेल्या पाच ते सहा वर्षांत प्रथमच ही दीर्घकाळाची थंडी राज्याला अनुभवता आली. जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात उत्तरेकडील राज्यांसह मध्य प्रदेशपर्यंत थंडीची तीव्र लाट होती. त्यामुळे राज्यातही मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट होती. संपूर्ण राज्याच्या किमान तापमानाचा पारा मोठय़ा प्रमाणावर घसरल्याने हुडहुडी भरली होती. सध्या उत्तरेकडील थंडीची लाट ओसरली आहे. उत्तर प्रदेश आणि जवळच्या परिसरात थंडीची सौम्य लाट आहे. तेथून काही प्रमाणात थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे विदर्भातील काही भागांत अद्यापही गारवा कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही भागांत थंडी आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र किमान तापमान सारसरीजवळ आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत गारवा घटला आहे.

* पुढील दोन ते तीन दिवस उत्तर भारतासह मध्य प्रदेश ते छत्तीसगडपर्यंत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. काही भागांत गारपिटीचीही शक्यता आहे.

* विदर्भात त्याचा किंचित परिणाम होऊ शकतो. ही स्थिती निवळल्यानंतर मात्र पुन्हा गारवा वाढण्याची शक्यता आहे.

* हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम भारतात दोन दिवस तापमानात मोठय़ा प्रमाणात चढ-उतार होणार नाहीत. मात्र, त्यानंतर किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

* उत्तर भारतातही या कालावधीत तापमानात घट राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही तापमानात घट होऊन पुन्हा गारवा अवतरण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button