मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Uddhav-Thackeray-Rashmi-Thackeray.jpg)
पुणे – गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय व्यक्तींचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे फोटो एडिट करून आक्षेपार्ह लिखाण करून समाज माध्यमांवर पसरवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. असाच एक प्रकार पुण्यामध्ये घडला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती.
दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या राजेंद्र पंढरीनाथ काकडे या 52 वर्षीय व्यक्तीला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राजेंद्र काकडे हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी बद्दल 7 मे रोजी त्याने आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामीकारक लिखाण केलं होतं. त्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती.
मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजकीय व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, असं कृत्य केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. यापूर्वी पुण्यामधूनच असे अनेक प्रकार समोर आले होते. त्यापैकी अनेकांना पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
या सर्व प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बनावट आयडी उघडून आपल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आक्षेपार्ह विधान करत पोस्ट करत असताना पाहायला मिळत आहेत.