पुण्यात राहणारे एक इराणी शरणार्थी बेहज़ाद अमीरी यांचे स्वप्न… “एक दिवस माझा मातृदेश लोकशाही राष्ट्र होईल”
World Refugee Day : इराणच्या बुशेहर प्रांतात जन्मलेले अमीरी सध्या पुण्यात राहतात

पुणे | पुण्यात राहणारे ७४ वर्षांचे इराणी शरणार्थी बेहज़ाद अमीरी यांना आजही हे स्वप्न आहे की, एक दिवस इराण हे एक लोकशाही राष्ट्र बनेल. “मला माहित नाही मी त्या दिवसापर्यंत जिवंत असेन की नाही, पण मला खात्री आहे की एक दिवस इराण लोकशाही राष्ट्र होईल,” असं अमीरी यांनी २० जून रोजी येणाऱ्या जागतिक शरणार्थी दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘‘महाईन्यूज’’ शी बोलताना सांगितलं.
इराणच्या बुशेहर प्रांतात जन्मलेले अमीरी सध्या पुण्यात राहतात. त्यांनी २६ व्या वर्षी भारतात उच्च शिक्षणासाठी येण्यापूर्वी इराणच्या सैन्यात दोन वर्षांची अनिवार्य सेवा पूर्ण केली होती, जिथे ते शाह ऑफ इराणच्या विशेष छावणीत कार्यरत होते. “मी पुण्यातील वाडिया कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात बी.ए. केलं. त्यानंतर एम.ए. साठी प्रवेश घेतला… पण १९७९ मधील इस्लामिक क्रांतीनंतर दोन महिन्यांनी मी इराणला परत गेलो. माझ्या वडिलांनी मला परत जाऊ नकोसं सांगितलं होतं, कारण मला तिथे ठार मारलं जाऊ शकत होतं. मी नेहमीच लोकशाहीचा समर्थक राहिलो आहे आणि इस्लामिक राजवटीविरोधात होतो. त्यामुळे मी इराण सोडून दिलं. मी तेहरानहून पुन्हा भारतात आलो आणि पुण्याच्या कॅम्प भागात राहायला लागलो,” असं त्यांनी सांगितलं.
अमीरी यांनी सांगितलं की, इस्लामिक राजवटीने त्यांना ब्लॅकलिस्ट केलं होतं. “२६ ऑगस्ट १९८२ रोजी मला भारतात शरणार्थी दर्जा मिळाला,” असं त्यांनी नमूद केलं. पुण्यातच त्यांचं आयुष्य स्थिरावलं. त्यांनी इस्मत नावाच्या भारतीय महिलेशी विवाह केला. इस्मत यांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा एक मुलगा आणि मुलगी आहे — दोघेही भारतात जन्मलेले. सध्या ते पुण्यातील NIBM रोड येथे राहतात. त्यांचा मुलगा एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करतो.
“माझ्या आईचे मी लहान असताना निधन झाले. वडिलांना इस्लामिक राजवटीने तुरुंगात टाकले होते, पण नंतर त्यांची सुटका झाली. एकदा ते पुण्यात मला भेटायला आले होते. त्यांनी माझ्यासोबत दहा दिवस घालवले. पण काही काळानंतर त्यांचा इराणमध्ये मृत्यू झाला. मी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही जाऊ शकलो नाही, कारण तिथे गेलो असतो तर मला ठार मारलं असतं. मी माझ्या इराणी मित्रांशी फारसे बोलत नसे, कारण त्यामुळे त्यांनाही धोका पोहोचू शकला असता. पुण्यात काही समर्थक आणि हितचिंतकांच्या मदतीने मी एक नवं आयुष्य सुरू केलं,” असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : मुंबईत ठाकरेच वरचढ; BMC निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवार यांचं मोठं विधान
NAMIR (National Movement of the Iranian Resistance) या संघटनेचे भारतातील प्रमुख सदस्य म्हणून अमीरी कार्यरत आहेत. ही चळवळ इराणचे माजी पंतप्रधान शापूर बख्तियार यांनी स्थापन केली होती. NAMIR हे देश-विदेशातील इराणी नागरिकांचं एक व्यापक संघटन आहे, जे “इस्लामिक धर्माधारित राजवटीचा अंत करून मानवी हक्कांची रक्षा करणारी लोकशाही सरकार” स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
“मी NAMIR मध्ये सहभागी झाल्यानंतर मी कमीत कमी पाच वेळा बख्तियार यांच्याशी टेलिफोनवर संवाद साधला होता. ते पॅरिसमध्ये राहत होते आणि तिथूनच NAMIR चे नेतृत्व करत होते,” असं त्यांनी सांगितलं. १९९१ साली फ्रान्समध्ये बख्तियार यांची हत्या करण्यात आली. “ते लोकशाहीचे खंदे समर्थक होते. त्यांनी आम्हाला दिलेला नारा होता — ‘Iran Will Never Die’. NAMIR चे सदस्य वर्षातून दोनदा ऑनलाइन मिटिंग्स घेतात. आम्ही अजूनही इराणमधील धर्माधारित राजवटीचा विरोध करत आहोत आणि लोकशाही स्थापनेच्या विचारांचा प्रचार करतो,” असं अमीरी यांनी सांगितलं.
दररोज ते इराणमधील घटनांवर आधारित अहवाल व्हॉट्सॲपवर शेअर करतात आणि त्यासोबत “Iran Will Never Die” हा नारा देतात. इस्त्राईल-इराण संघर्षावर त्यांना विचारल्यास त्यांनी सांगितलं, “मी इराणमधील हुकूमशाही धर्मराजवटीचा विरोधक आहे. पण इस्त्राईलने इराणमधील सामान्य नागरिकांचे जे हत्याकांड सुरू केले आहे, त्यालाही मी विरोध करतो… मला भारतीय लोकशाहीबद्दल खूप आदर आहे. मला वाटतं की इराणही भारतासारखं लोकशाही राष्ट्र व्हावं.” NAMIR च्या भारत शाखेचे प्रमुख म्हणून अमीरी यांनी पुण्यात “Cyrus the Great Day” सारखे कार्यक्रम आयोजित केले आहेत. हा दिवस ते “मानवाधिकारांचे पहिले जाहीरनामे” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Cyrus Cylinder च्या सन्मानार्थ साजरा करतात. या कार्यक्रमात ते “सायरस द ग्रेट” यांचा फोटो आणि १९७९ पूर्वीचा इराणचा झेंडा ठेवून एक मिनिट मौन पाळतात.
“२९ ऑक्टोबर (इराणी दिनदर्शिकेनुसार ७ अबान)” हा दिवस Cyrus ने बाबिलोनमध्ये प्रवेश केलेला दिवस म्हणून ओळखला जातो, असं ते म्हणाले. “Cyrus हा अचेमेनिड साम्राज्याचा संस्थापक होता आणि त्याच्या मानवाधिकार, राजकारण व लष्करी क्षेत्रातील योगदानामुळे तो खूप सन्मानित आहे. आम्ही इराणी लोक हा दिवस Unity Day म्हणून साजरा होण्यासाठी आग्रह धरतो.” १९७९ च्या इराणी क्रांतीच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात NAMIR च्या वतीने अमीरी यांनी इराणमधील “अराजकतेच्या राजवटीविरोधात” एकजूट सभा देखील आयोजित केली होती.