शहरात १९ ठिकाणी झाडपडीच्या घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-91-1-780x470.jpg)
पुणे : पुणे शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यरात्रीनंतर शहराच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसामुळे शहरातील १९ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. घटनास्थळी अग्नीशन दलाच्या जवानांनी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
शहर विविध परिसरात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. रविवारी देखील पावसाने हजेरी लावल्याने शहरात मुसळधार झालेल्या पावसामुळे दिवसभरात वेगवेगळ्या झाड पडल्याच्या घटना घडल्या. कोथरुड परिसरातील एमआयटी महाविद्यालयाजवळ, कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता, गंज पेठ, हडपसर भागातील १५ नंबर चौक, कोथरुड बस डेपो, पाषाण, जनवाडीतील अरुण कदम चौक, प्रभात रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वडारवाडी, कसबा पेठ, बिबवेवाडी, पाषाण येथील वीरभद्रनगर, कोथरुडमधील सुतार दवाखाना, महंमदवाडी, नऱ्हे अभिनव कॉलेजजवळ, मुकुंदनगर, विश्रांतवाडी भागात झाडे कोसळली. झाडे कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करून दिले.
हेही वाचा – रोहित शर्माचे वनडे-कसोटी निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, मी पुढचा..
कात्रज भागातील गुजरवाडी परिसरात असलेल्या तलावात एक महिला बुडाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवांनी घटनास्थळी धाव घेतली. कात्रज केंद्रातील जवानांकडून महिलेचा शोध सुरु आहे. तलावात बुडालेल्या महिलेची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
वाहन चालकांची तारांबळ.. शहरात शनिवार मध्यरात्रीपासून पावसाला जोरदार सुरवात झाली होती.रविवारी सकाळी पावसाची रिपरिप सुरुच होती. मात्र त्यांनतर काही काळासाठी पावसानी उघडीप घेतली होती. परंतु पावसाला सुरुवात झाली. रविवार असल्याने अनेक नागरिक खेरदीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहने चालवाना कसरत करावी लागत होती. तसेच काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.