पुण्यात कठोर टाळेबंदी लागू करा! उच्च न्यायालयाची सूचना
![Worrying! ‘Delta Plus variant’ was found in seven patients in Maharashtra; Five patients from the same district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-3-1.jpg)
पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई आणि पुण्याला मोठा फटका बसला आहे. सध्या पुण्यात १ लाख ४० हजार उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने ही चिंताजनक स्थिती असून रुग्णसंख्या अशीच वेगाने वाढत असेल तर गेल्या वर्षीप्रमाणे पुण्यात कठोर टाळेबंदी लागू करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.
कोरोना गैरव्यवस्थापनाबाबतच्या याचिकांवरील सुनावणीच्या वेळी राज्यातील उपचाराधीन रुग्णांची जिल्हानिहाय माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सादर केली. यावेळी पुण्याची आकडेवारी पाहून खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांचा आकडा ५६ हजार आहे, तर पुण्यात हा आकडा १ लाख ४० हजार आहे. मुंबईच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे, असेही सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगितले. त्यावर संपूर्ण राज्यात नाही, पण पुण्यासारख्या वेगाने रुग्णसंख्या वाढणाऱ्या भागांमध्ये गेल्या वर्षीसारखी कठोर टाळेबंदी लागू करण्याबाबत विचार करण्याची सूचना न्यायालयाने केली.
दरम्यान, पुण्यातील रुग्णसंख्या एवढी कशी वाढली, पुणे पालिकेने ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना का केल्या नाहीत, मुंबईत रुग्णसंख्या कशी आटोक्यात आणली याबाबत पुणे पालिका आयुक्तांनी मुंबई पालिका आयुक्तांशी संपर्क साधून याबाबत चर्चा का केली नाही, अशी विचारणा न्यायालयाने पुणे पालिकेच्या वकिलांकडे केली. त्यावेळी पुण्यात मुंबईसारख्या पायाभूत सुविधा नाहीत तसेच मुंबई पालिकेसारखी खर्च करण्याची क्षमताही नाही, असे पालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.