अवैध दारूचा पर्दाफाश: पोलिस कारवाईत १ कोटी ८५ हजार जप्त, तिघांना अटक

पुणे | पुणे शहरातील कोंढवा परिसरात अवैध दारूविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोंढवा येथील काकडे वस्ती, गल्ली क्रमांक २ मधील एका घरावर छापा टाकताना पोलिसांना सुमारे २ लाख रुपये किमतीची अवैध दारू आढळून आली. मात्र, पुढील तपासादरम्यान एका कपाटामध्ये तब्बल १ कोटी ८५ हजार रुपयांची रोकड सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला.
पोलिसांनी घटनास्थळी नोटा मोजण्याचे मशीन मागवले होते. सापडलेली रोकड मोजण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा : महापालिका निवडणूक प्रचारासाठी चौक व कोपरा सभांचे शुल्क निश्चित
या प्रकरणात पोलिसांनी अमर कौर उर्फ मद्रीकौर दादासिंग जुनी, दिलदार सिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी सिंग या तिघांना अटक केली आहे. जप्त केलेली सर्व रोकड आणि अवैध दारू पोलिसांनी ताब्यात घेतली असून, ही रक्कम नेमकी कोणत्या व्यवहारातून आली, याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे.
अवैध दारूच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून, या कारवाईमुळे परिसरात एकच चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.





