Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

महापालिका निवडणूक प्रचारासाठी चौक व कोपरा सभांचे शुल्क निश्चित

पुणे : पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवार व राजकीय पक्षांना प्रचारासाठी चौकसभा, कोपरा सभा तसेच मोकळ्या जागांचा वापर करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दर प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या रस्ते, चौक, मोकळे प्लॉट, तसेच शैक्षणिक संस्थांच्या मैदानांचा प्रचारासाठी वापर करण्यासाठी ठरावीक शुल्क व अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार चौक सभेसाठी साधारण चार हजार ते पाच हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून, यासाठी सुमारे दोन हजार चौरस मीटर क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे. सन २०२५-२६ च्या रेडीरेकनर दरानुसार प्रति चौरस मीटर दोन रुपये दराने जागेचे भाडे निश्चित करण्यात आले असून, चौक सभेसाठी एकूण सुमारे आठ हजार रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. यासोबतच जागेच्या साफसफाईसाठी अडीच हजार रुपयांची रक्कम आणि दहा हजार रुपयांची अनामत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा –  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! भूसंपादनात जमीन जाणाऱ्यांसाठी आता स्वतंत्र महामंडळ होणार

कोपरा सभेसाठी दोन हजार ते अडीच हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून, सुमारे आठशे चौरस मीटर क्षेत्र गृहीत धरले आहे. यासाठी सुमारे सात हजार दोनशे रुपये शुल्क, अडीच हजार रुपये साफसफाई शुल्क आणि चार हजार रुपयांची अनामत रक्कम आकारली जाणार आहे.

याशिवाय महापालिकेच्या ताब्यातील अमिनिटी स्पेस, मोकळे प्लॉट, खेळाची मैदाने तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांची मैदाने प्रचारासाठी वापरण्यासाठी मागणीनुसार क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. अशा जागांसाठी प्रति चौरस मीटर दोन रुपये दराने शुल्क आकारले जाईल. साफसफाईसाठी अडीच हजार रुपये स्वतंत्रपणे द्यावे लागणार असून, अनामत रक्कम प्रतिदिन भाड्याच्या ५० टक्के इतकी ठेवावी लागणार आहे.

प्रचारादरम्यान सार्वजनिक मालमत्तेची हानी होऊ नये, स्वच्छता राखली जावी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे दर निश्चित करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button