नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हिंदू संघटन आवश्यक: डॉ. भाडेसिया
![Hindu organization necessary to face new challenges: Dr. tenant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-03-at-4.18.52-PM-780x470.jpeg)
पुणे : संघटनेत ताकद असते. आपल्या देशापुढील अनेकविध आव्हानांचा सामना करायचा तर त्यासाठी विज्ञान- तंत्रज्ञाना सोबत हिंदूंची संघटित शक्ती उभी करणे अगत्याचे आहे. त्या शक्तीचे विस्मरण होवू नये म्हणून विजयादशमी उत्सव व शस्त्रपुजन ही आपली परंपरा आहे” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र गुजरात व गोवा चे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ.जयंतीभाई भाडेसिया यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील संभाजी भागाच्या वतीने आयोजित विजयादशमीच्या शस्त्र पुजन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आंतरराष्ट्रीय विशेषज्ञ-स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान व एआरएआयच्या माजी संचालिका सौ.रश्मी उर्ध्वरेषे या उपस्थित होत्या.
“काळानुरूप देशापुढील आव्हाने बदलली आहे. दहशतवाद, भाषावाद, अस्पृश्यता, घुसखोरी, बहुराष्ट्रीय विदेशी कंपन्यांचे आक्रमण,भ्रष्टाचार, वायू प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग हे नवनवीन दानव आपल्यासमोर आव्हान बनून उभे आहेत.यांच्यावर विजय मिळविण्यासाठी संघटित शक्तीची गरज आहे”.असे प्रतिपादन डॉ जयंतीभाई भाडेसिया यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ रश्मी उर्ध्वरेषे यांनी आपल्या मनोगतामध्ये “भारतीय ऑटोमोबाईल उद्योग,त्याची बलस्थाने आणि भविष्यातील ऑटो क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेतला. माझे वडील स्वतः संघ कार्यकर्ते होते. संघ आणि स्वयंसेवकांची शिस्त व देशभक्ती अनुकरणीय आहे.”असेही त्या यावेळी म्हणाल्या.
विजयादशमी शस्त्र पुजन कार्यक्रमाच्या सुरवातीला ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थित संघ स्वयंसेवकांनी योगासने, पदविन्यास, दंड युद्ध, घोष आदी प्रात्याक्षिके सादर केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संभाजी भागाचे भाग कार्यवाह सुधीर जवळेकर यांनी कार्यक्रमात प्रस्तावना केली व पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्सव व त्यांच्या उत्सवाविषयीची माहिती सांगितली.या कार्यक्रमाला सुमारे बाराशे स्वयंसेवकांची उपस्थिती होती तर भागातील पाचशेहून अधिक नागरिक माता-भगिनींची उपस्थिती होती.