पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात झाडे पडली, ट्रॅफिक जाम
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊ लागला. आज (३० सप्टेंबर) दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर हीटमुळे परतीचा मान्सूनही सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात थंडीला सुरुवात झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. मात्र दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे.
पुण्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारनंतर पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. अवघ्या 20 मिनिटांच्या पावसात अनेक भागात पाण्याचे नाले वाहत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी वाहून गेल्या होत्या.
शहरात अचानक वादळी पाऊस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडू लागली. पावसामुळे लगेचच रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. शहरात काही ठिकाणी किरकोळ अपघातही झाले.





