पुण्यातील साने गुरूजी मंडळाच्या गणपती देखाव्याला भीषण आग
सुदैवाने अनर्थ टळला : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भेटीदरम्यानची घटना
![Heavy fire breaks out at Sane Guruji Mandal's Ganpati scene in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Pune-Fire-780x470.jpg)
पुणे: पुण्यातील साने गुरुजी तरुण मित्र मंडळाच्या गणपतीच्या देखाव्याला आग लागली. गणपतीसाठी तयार करण्यात आलेल्या सजावटीला आग लागली, अगदी कळसापर्यंत आग पोहोचली.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे आज पुणे दौर्यावर होते. त्यावेळी पुणे शहराचे भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी साने गुरुजी तरुण मंडळाच्या आरतीसाठी नड्डा यांना आमंत्रित केलं होतं. यानंतर जे पी नड्डा हे आरतीसाठी दाखल झाले. दरम्यान, आरती सुरू झाल्यावर, देखाव्याच्या वरच्या बाजूला आग लागल्याची घटना घडली. ही घटना लक्षात येताच जे पी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. तर काही मिनिटात घटनास्थळी अग्निशामक विभागाचे कर्मचारी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.
ही आग नेमकी कशामुळे लागली? याची पुष्टी अद्याप झाली नाही. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीड मिनिटांच्या या व्हिडीओत गणपतीच्या स्टेजला आणि मंदिराप्रमाणे उभारलेल्या सजावटीला आग लागल्याचं दिसत आहे. आगीच्या घटनेनंतर गणेशभक्तांमध्ये गोंधळ निर्माण झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.