पुण्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना ‘हा’ गणवेश अनिवार्य; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी गणवेश आणि ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 21 च्या पोटनियम 18 नुसार, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यवसाय करताना पांढरा शर्ट (बुश शर्ट) आणि खाकी पँट असा गणवेश घालणे अनिवार्य आहे. तसेच, परवाना प्राधिकरणाने जारी केलेले 50 रुपये शुल्काचे लॅमिनेटेड ओळखपत्र उजव्या बाजूस छातीवर प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
पुणे RTO मार्फत लवकरच ऑटोरिक्षा आणि टॅक्सींची विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान गणवेश, ओळखपत्र, वाहनाची वैध कागदपत्रे आणि मीटर तपासणी यांचे काटेकोर पालन तपासले जाईल. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले की, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण आणि मीटर तपासणीच्या वेळी या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा आणि प्राधिकरणाच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई होईल.
हेही वाचा – गुगल करणार मोठा बदल ! संपूर्ण जगाचे बदलेल डोमेन; वापरकर्त्यांवर काय होणार परिणाम?
RTO ने सर्व ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी गणवेश आणि ओळखपत्र नियमांचे पालन करावे आणि वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत. तपासणी दरम्यान दोषी आढळल्यास दंड आणि अन्य कारवाईला सामोरे जावे लागू शकते. यामुळे गैरसोयी टाळण्यासाठी चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे प्रशासनाने सुचवले आहे.