प्राणीजन्य आजारासह जीएम, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये पशुवैद्यकाचा सहभाग महत्त्वाचा असेल: डॉ. दीपक म्हैसेकर
बदलत्या काळात पशुवैद्यकांची जबाबदारी महत्त्वाची- डॉ. म्हैसेकर
![GM, Global Warming With Animal Disease, Veterinarian Involvement Will Be Important: Dr. Deepak Mhaisekar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Pune-780x470.jpg)
पुणे: बदलत्या काळात प्राणिजन्य आजारासह एआय, जीएम् व जागतिक तापमान वाढीत पशुवैद्यकाचा सहभाग हा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी त्यांनी पूर्ण तयारीने योगदान द्यावे असे आवाहन जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात डॉ. दिपक म्हैसेकर माजी विभागीय आयुक्त यांनी केले. ते पुढे म्हणाले की रेबीज, टीबी सारखे प्राणीजन्य आजार हे सन २०३० पर्यंत देशातून हद्दपार करावयाचे आहेत त्यासाठी निश्चित असे धोरण व कार्यवाही करण्यासाठी वैद्यकीय विभाग व पशुसंवर्धन विभाग यांना एकत्र येऊन कार्यवाही करावी लागेल, सोबत शासनाने देखील त्याची दखल घ्यावी असे सुचित केले.
जागतिक पशुवैद्यक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान पुणे, महाव्हेट पुणे व आयएमए पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे येथे कामधेनु सभागृहात आयोजित चर्चासत्रात बोलत होते. या वर्षाच्या जागतिक पशुवैद्यक संघटनेच्या ‘पशुवैद्यकांचा मानवी आरोग्यातील सहभाग’ या कल्पनेला अनुसरून डॉ. मुरलीधर तांबे प्राध्यापक व विभागप्रमुख जनकल्याण औषधशास्त्र विभाग बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे यांनीही रेबीज टीबीसह अनेक प्राणिजन्य आजाराबाबत सविस्तर माहिती दिली. एकूणच असणाऱ्या ७५ टक्के प्राणिजन्य आजाराच्या नियंत्रण व निर्मूलनात पशुवैद्यकांचे योगदान हे फार महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करून भविष्यात वैद्यकीय व पशुवैद्यकीय विभाग हे सामाजिक आरोग्य राखण्यात मागे राहणार नाहीत असे प्रतिपादन केले. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. रमेश वझरकर अध्यक्ष, ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान पुणे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यात जेष्ठ, सेवानिवृत्त पशुवैद्यक व कार्यरत पशुवैद्यकांना एकत्र काम करावे व त्या माध्यमातून राज्यातील पशुपालकांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोचवावे असे आवाहन करून आजच्या पशुवैद्यक दिनाचे महत्त्व विशद केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. सुनील राऊतमारे व सूत्रसंचालन डॉ. व्यंकटराव घोरपडे आणि डॉ. सुमंत पांडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. रामदास गाडे अध्यक्ष महाव्हेट यांनी केले. सदर कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व पुण्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे सभासद हजर होते.