ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, १०५ औषध दुकानांना टाळे

पुणे | पुणे विभागात ३९२ दुकानांचे परवाने निलंबित करून १०५ दुकाने कायमची बंद करण्याची कारवाई केली. पुणे विभागात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. इथे तब्बल १९५ औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत; तसेच ६८ दुकानांना कायमचे टाळे ठोकण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाने गेल्या वर्षभरात केली.

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात औषध विभागाने औषध दुकानांची तपासणी, रक्तपेढ्या, रक्त साठवणूक केंद्रे, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, कॉस्मेटिक यांसारख्या शाखांच्या औषध कंपन्यांची तपासणी करण्याची कामगिरी पुणे विभागाच्या ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी केली. ही कामगिरी एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या दरम्यानच्या कालावधीत पाच जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. याबाबत ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी माहिती दिली.

पुणे जिल्ह्यासह पुणे विभागात एकूण दोन हजार ३२५ औषध दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३९२ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत; तसेच १०५ औषध दुकानांचा परवाना कायमचा रद्द करण्यात आल्याने त्यांच्या दुकानांना टाळे ठोकण्याची कारवाई ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी केली. पुणे जिल्ह्यात आजमितीला सुमारे आठ हजार औषध विक्रीची दुकाने आहेत. त्यापैकी जिल्ह्यात एक हजार २९६ दुकानांच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. औषध निरीक्षकांना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाच्या कारवाईनंतरही योग्य ती सुधारणा न झाल्याने संबंधित औषधविक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

१५ औषध कंपन्यांवर छापे

गेल्या वर्षभरात विविध कंपन्यांच्या औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी ‘एफडीए’कडे आल्या होत्या. त्या तक्रारीच्या आधारे ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील १५ औषध कंपन्यांवर छापे घातले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सात कंपन्यांचा समावेश आहे. ‘या कंपन्यांमधून विना परवाना उत्पादन होत असल्याचे आढळले; तसेच कंपन्यांकडून ‘शेड्युल एम’ या आदर्श उत्पादन पद्धतीचे पालन झालेले नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे कंपन्यांमधून एक कोटी सहा लाख ३७ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला. त्या कंपन्यांवर न्यायालयीन कारवाईही करण्यात आली आहे,’ अशी माहिती सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली.

 

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या नुसार औषध दुकानांची तपासणी करताना औषधे योग्य तापमानात न ठेवणे, औषधांची खरेदी-विक्रीचा हिशोब न जुळणे, फार्मसिस्टची नसणे आणि त्याच्या अनुपस्थितीत औषध विक्री करणे; तसेच शेड्युल एच, एच-१ या वर्गातील औषधांचा ताळमेळ न जुळणे आदी कारणांमुळे औषध दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

– एस. बी. पाटील, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग

औषध दुकानांची पुणे विभागातील तपासण्या आणि कारवाईची स्थिती

जिल्हा तपासण्यांचे उद्दिष्ट निलंबन रद्द

पुणे १,२९६ १९५ ६८

सातारा २४५ १६ १

सांगली २६४ ८१ १२

सोलापूर १७३ ३५ १०

कोल्हापूर ३४७ ६५ १४

एकूण २,३२५ ३९२ १०५

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button