पुण्यात शेकोटीवर बंदी! महापालिकेचा नियम मोडल्यास होणार दंडात्मक कारवाई

पुणे | पुण्यात थंडीची चाहूल लागली असताना अनेक सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक आणि रात्रपाळीतील कामगार उब मिळवण्यासाठी शेकोटी पेटवतात. मात्र, यामुळे वाढणारे वायू प्रदूषण लक्षात घेऊन पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरात शेकोटी पेटवण्यास सक्त मनाई केली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांनी आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?
पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिगरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या घरांमुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे.
हवा प्रदूषणामुळे न केवळ वातावरणामध्ये बदल होतात, तर याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होतो. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड PM 10. PM 2.5. आणि अन्य हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो, ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे.
हेही वाचा : डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करणेसाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. जसे कि “हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१” अंतर्गत भाग ४ कलम १९ (५), आणि “घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६” कलम १५ (छ) तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांचेकडील राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमची २५/८/२०२२ रोजीची मार्गदर्शक तत्वे यानुसार उघड्यावर कोळसा / जैविक पदार्थ (बायोमाम)/प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळण्यास मनाई केली आहे.
जर पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा / जैविक पदार्थ (बायोमास) / प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केला आणि कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, गफाई कामगार आणि इतर कामगार व्यक्ती, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगार या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, त्यांच्यावर पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल.





