breaking-newsताज्या घडामोडीपुणे

चांदणी चौकातील खड्डे आठ दिवसांत बुजवा – आमदार चंद्रकांत पाटील

पुणे – चांदणी चौकातील खड्डे आठ दिवसांत भरुन रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करा, केवळ कारणे देऊ नका, असा कडक इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला.दोन दिवसांपूर्वीच पाटील यांनी चांदणी चौकातील वाहतूक कोंडी संदर्भात प्रत्यक्ष पाहाणी करुन, अधिकाऱ्यांना तातडीने खड्डे बुजवण्याची सूचना केली होती. त्यानंतर बुधवारी रात्री पुन्हा चौकातील रस्त्याच्या कामाची पाहाणी केली. यावेळी रस्त्याचे काम समाधानकारक न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या पाहाणी दौऱ्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडे-पाटील, जयंत भावे, नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, वाहतूक पो. नि. बापू शिंदे, प्रत्यक्ष काम करणाऱ्या कंत्राटदाराचे प्रतिनिधी श्रीनिवासन, भाजपचे कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, गणेश वर्पे, बाळासाहेब टेमकर, सचिन पवार, वैभव मुरकुटे आदी उपस्थित होते.

रस्त्याच्या पाहाणीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, चांदणी चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चार दिवसांपूर्वीच रस्त्याची प्रत्यक्ष पाहाणी करुन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी चार प्रमुख मागण्या केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत ही प्रमुख मागणी होती.

त्याचबरोबर मुळशी वरून चांदनी चौकात येताना रस्त्यावर असलेले पत्रे थोडे मागे सरकावून अतिरिक्त लेन तयार करणे, जेणेकरून वाहतूक सुकर होईल. त्याशिवाय सर्व्हिस रस्ते डागडुजी करून तातडीने करणे आणि बावधनकडून येणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी 25 ट्रॅफिक वार्डनची तातडीने नियुक्ती करणे आदींचा समावेश होता. त्यापैकी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते.

ते पुढे म्हणाले की, रस्त्याचे काम योग्य पद्धतीने झाले की नाही, याची पाहणी करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार आज सदर ठिकाणची पाहाणी केली. मात्र, तरीही रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचे निर्दर्शनास आले. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, माननीय राज्यपालांचा दौरा आणि देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनामुळे कामास विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दोन्ही कारणे रास्त असल्याने पुढील आठ दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, कोणत्याही प्रकारची कारणे देऊ नयेत, असे स्पष्ट केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, सदर रस्ता तीव्र उताराचा आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता जास्त आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच रस्त्याचे काम जोपर्यंत सुस्थितीत होत नाही, तोपर्यंत अतिशय बारकाईने याचा पाठपुरावा करणार आहे.

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना चॉकलेट देऊन त्यांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अधिकारी कर्मचारी चुकले किंवा त्यांनी नीट काम केले नाही की, आपण त्यांना फैलावर घेतो, पण जर चांगले काम केले; तर त्यांचे कौतुक देखील केले पाहिजे असेही ते म्हणाले. आमदारांनी सुचविलेल्या उपाययोजना येत्या आठ दिवसात अंमलात आणू, असे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button