‘बारामतीच्या वैभवात भर घालणारी शिवसृष्टी उभारा’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना

Ajit Pawar : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल यादृष्टीने प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून बारामतीच्या वैभवात भर घालणारी भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
अजित पवार यांनी तालुका फळरोपवाटिका, शिवसृष्टी, जलतरण तलाव, कन्हेरी वनोद्यान येथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, शिवसृष्टीची कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याबाबत दक्षता घ्यावी. शिवसृष्टीचे काम नागरिकांना हेवा वाटेल, असे करावे. परिसरात अधिकाधिक वृक्षांची लागवड करून संपूर्ण परिसर हिरवागार राहील, असे नियोजन करावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी.
तालुका फळरोपवाटिका कन्हेरी येथील दुरुस्तीची किरकोळ कामे पूर्ण करून घ्यावीत. संरक्षक भिंती आणि रस्ताच्या बाजूला वृक्षारोपण करावे. परिसरात शोभिवंत झाडे लावावीत. प्रवेशद्वाराला वनोद्यानाशी सुसंगत रंगरंगोटी करावी. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पायर्यांची व बैठक व्यवस्था करावी. तलावात नौकाविहार सुरू करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
हेही वाचा – पीक विमा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज
नव्याने उभारण्यात येणार्या जलतरण तलावाची कामे करताना दर्जेदार, टिकाऊ फरशा बसवाव्यात. विकासकामे करताना कालव्याच्या भिंतीला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.
या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.
बारामतीच्या दौर्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झारगडवाडीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या निकृष्ट कामाची तक्रार केली. पवार यांनी अधिकार्यांना पाहणी करत तत्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
झारगडवाडीतील नितीन मासाळ व अन्य ग्रामस्थांनी पवार यांना निवेदन दिले. झारगडवाडीत ज्ञानदेव भापकर घर ते सुळ यांच्या घरापासून आवटेवस्ती रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु निविदेनुसार काम होत नाही. रस्त्यासाठी वापरला जाणारा मुरुम, खडी हलक्या प्रतीचा वापरला जात आहे. त्यामुळे रस्ता निकृष्ट दर्जाचा होत आहे. या रस्त्याचे काम त्वरीत थांबवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
हे काम थांबले नाही तर गावपातळीवर ग्रामस्थांकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. नेमके कोणाच्या पाठबळामुळे हे निकृष्ट काम केले जात आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम होत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. प्रांताधिकार्यांसह गटविकास अधिकारी, पंचायत समितीचा बांधकाम विभाग यांना याबाबत निवेदने दिली होती, परंतु दखल घेतली गेली नाही. त्यामुळे थेट उपमुख्यमंत्री पवार यांनाच यासंबंधी निवेदन देण्यात आले.




