धनंजय मुंडेंना 30-40 वेळा फाशी देता येईल एवढे पुरावे; मनोज जरांगेंचा दावा

छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो समोर आल्याचे प्रकरण ताजे असतानाचा जालन्यातील अन्वा येथे एका तरुणाला तप्त सळईने चटके दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणातील आरोपी मनोज जरांगेंचा उजवा हात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला होता.
याबाबत मनोज जरांगेंना पत्रकारांनी विचारले असता, किचडाचे प्रश्न विचारू नका, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाकेंवर केली. तसेच 30 ते 40 वेळा धनंजय मुंडे यांना फाशी द्यावी लागेल एवढे पुरावे असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.
हेही वाचा – “…हा भाजपाचा छुपा अजेंडा”, भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा संताप
जरांगे पुढे म्हणाले, धनंजय मुंडे हा स्वतःच्या प्रॉपर्टी कराडच्या नावावर ठेवत होता. फडणवीस जेव्हा आरोपीच्या संपत्ती जप्त करतील तेव्हा धनंजय मुंडे यांना त्रास होईल, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे आहेत. एसआयटी आणि सीआयडीकडे पुरावे आहेत. पुनर्तपास होणार. पोलिसांना विश्वासात घेऊन सागर बंगल्यावर बैठक घ्या. पोलिस ट्रक भरून पुरावे देतील. 30 ते 40 वेळा धनंजय मुंडे यांना फाशी द्यावी लागेल एवढे पुरावे आहेत, असा दावाही त्यांनी केला.
जरांगेंनी या अधिवेशनात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी देखील मागणी केली. या अधिवेशनात तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांनी द्यावेत. सगे सोयरे अंमलबजावणी करण्यात यावी. सर्व गुन्हे मागे घेऊ म्हणाले, पावणे दोन वर्षे झाले. मात्र गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला असताना मागे न घेतल्याने गुन्हे मागे घ्या. शिंदे समिती काम करत नाही. अधिकारी विनाकारण वेठीस धरतात. शिंदे समितीला 24 तास कामाला लावावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.