breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुण्यातील कोरोनाग्रस्तांवर होणार ‘प्लाझ्मा थेरपी’; ‘आयसीएमआर’कडून परवानगी

करोनामुळे पुण्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. वाढती रुग्णसंख्या आणि करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, चिंतेचं वातावरण असताना करोनाग्रस्त रुग्ण आणि पुणेकरांना दिलासा देणारी घटना घडली आहे. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं परवानगी दिली आहे.

करोनानं पुण्यात पाऊल ठेवत महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यानंतर हळूहळू मुंबई, नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले. मात्र, तोपर्यंत पुण्यातील परिस्थिती चिंताजनक वळणावर पोहोचली होती. सध्या पुणे रेड झोनमध्ये आहे. अनेक वसाहतींना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. प्लाझ्मा थेरपी करोनाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचं वैद्यकीय पाहणीतून समोर आलं होतं. त्यामुळे आयसीएमआरनं ही थेरपी उपचारासाठी वापरण्यास सुरूवात केली. देशातील अनेक ठिकाणी ही थेरपी वापरली जात असून, मुंबईत प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरली आहे.

पुणे जिल्हा प्रशासनानंही प्लाझ्मा थेरपीचा करोनाग्रस्त रुग्णांवर वापर करण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्याचबरोबर प्लाझ्मा थेरपीची करोनाग्रस्त रुग्णांवर चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. काही आठवड्यांपूर्वी केली होती. प्रशासनाची मागणी मान्य करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी करण्यास आयसीएमआरनं (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) परवानगी दिली आहे. तसं पत्र ससूनच्या प्रशासनाला मिळालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

“पुण्यात आतापर्यंत १०३ जणांचा करोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. त्यातील ६८ जण ससूनमध्ये दाखल होते. प्रशासनाला अनेक परवानग्या मिळाल्या आहेत. नियमानुसार वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यात येतील,” अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली. करोनाच्या आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्ती, ज्या प्लाझ्मा देण्यास तयार आहेत. त्यांची यादी महापालिकेकडून मागविली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा प्लाझ्मा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button