#CoronaVirus: खासगी प्रयोगशाळांनी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल परस्पर देऊ नये: मुख्यमंत्री
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (30 जुलै) पुण्याचा दौरा करत येथील कोरोना स्थितीचा आढावा घेतलेला आहे. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या सूचना घेत निर्देश दिले आहेत. खासगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर परस्पर तपासणी अहवाल रुग्णांना देऊन नये. तो अहवाल संबंधित महापालिकांना द्यावा, अशीही सूचना त्यांनी केलेली आहे. कोरोनाचा रुग्ण दर आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पुण्यातील विधान भवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येते आहे. असे होवू नये यासाठी खासगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा. जेणेकरुन रुग्णांना वेळेत रूग्णांना बेड उपलब्ध होईल.”