ताज्या घडामोडीपुणे

हडपसर भागातील वाहतूक बदलाने गोंधळ

पुणे | हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक झाल्याने उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचे काम महापालिकेकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे. उड्डाणपुल वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहतूक बदलामुळे गजबजलेल्या गाडीतळ भागात कोंडी होत असून वाहतूक बदलामुळे वाहनचालकही गोंधळून गेल्याचे दिसून आले आहे.

पुणे सोलापूर महामार्गावरील हडपसर गाडीतळ भागात दाट लोकवस्ती आहे. पुणे ते सोलापूर, सोलापूरहून पुण्याकडे जाणारे वाहनचालक हडपसर गाडीतळ भागातून जातात तसेच सासवडकडे जाणारे वाहनचालक गाडीतळमार्गे जातात. मांजरी, लोणी काळभोर, उरूळी कांचन परिसरातील गेल्या काही वर्षांपासून गृहप्रकल्प साकारण्यात आले आहे. या भागात बाहेरगावाहून नोकरी तसेच व्यवसायानिमित्त मोठय़ा संख्येने परगावातील नागरिक स्थायिक झाले आहे. पुणे सोलापूर महामार्गाचा वापर अवजड वाहने करतात. हडपसर उड्डाणपुल बांधण्यात आल्याने या भागातील वाहतूक कोंडी सुटली. मात्र, अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे हडपसर उड्डाणपुलाच्या काही भागाला तडे गेले असून उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक झाल्याचे निदर्शनास आल्याने नुकतीच तज्ञांकडून उड्डाणपुलाची तपासणी करण्यात आली. त्यामुळे शनिवारपासून (५ फेब्रुवारी) हडपसर उड्डाणपूल वाहतुकीस बंद करण्यात आला. उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचे काम तातडीने करण्यात येणार आहे. उड्डाणपूल वाहतुकीस बंद करण्यात आल्याने उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोंडी होत असून या भागातील वाहतूक बदलाची सूचना देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून फलक लावण्यात आले आहेत तसेच वाहतूक पोलीस कोंडी सोडविण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. वाहतूक बदलामुळे या भागातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्याचा वापर मोठय़ा संख्येने अवजड वाहने, चारचाकी तसेच दुचाकी वाहनचालक करत आहेत. वाहने रस्त्यावर आल्याने या भागात सध्या वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहायला मिळाले.

या भागातील वाहतूक बदलाची सूचना वाहनचालकांना देण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. यापूर्वी उड्डाणपुलाचा वापर वाहनचालकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे या भागात कोंडी होत नव्हती. उड्डाणपूल बंद करण्यात आल्याने सध्या पुलाखालील रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला असून वाहतूक विस्कळीत होत आहे. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी या भागात वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती हडपसर वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

वाहनचालकांच्या तक्रारी

उड्डाणपूल बंद केल्याने दररोज सकाळी आणि सायंकाळी या भागात वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, उड्डाणपुलाचे दुरूस्तीचे काम महापालिकेने तातडीने हाती घेतले असून पुढील आदेशापर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button