TOP Newsताज्या घडामोडीपुणे

शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धेला मराठीचे वावडे!

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) लोकसंख्या शिक्षण प्रकल्पाअंतर्गत राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या भूमिका अभिनय स्पर्धेत मराठी भाषेचा पर्यायच देण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदीं शाळांतील विद्यार्थ्यांना योग्य संधी कशी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 एनसीईआरटीच्या लोकसंख्या शिक्षण प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या भूमिका अभिनय आणि लोकनृत्य स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) दिल्या आहेत. ही स्पर्धा जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर होणार आहे. त्यात महापालिका, समाजकल्याण, नगरपालिका, जिल्हा परिषद, आश्रम शाळांसह नवोदय विद्यालये, केंद्रीय विद्यालयांतील नववीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. भूमिका अभिनय स्पर्धेसाठी केवळ इंग्रजी आणि हिंदी माध्यमाचाच पर्याय देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी निरोगी वाढ, पौष्टिक आहार, वैयक्तिक सुरक्षा, इंटरनेटचा सुरक्षित वापर, अमली पदार्थाचा गैरवापर – कारणे आणि प्रतिबंध असे विषय देण्यात आले आहेत. तसेच ५ ऑक्टोबपर्यंत नावनोंदणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आलेला असताना महाराष्ट्रात होणाऱ्या या स्पर्धेसाठी मराठीचा पर्याय का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. स्पर्धेसाठीच्या नाटिका इंग्रजी आणि हिंदीतून उपलब्ध होणे किंवा नव्याने लिहिणे कठीण आहे. इंग्रजी आणि हिंदीतून नाटिका सादर करणे विद्यार्थ्यांनाही कठीण आहे. राज्य स्तरावर स्पर्धेचे आयोजन होत असताना त्यात मराठी माध्यम असायला हवे. इंग्रजी आणि हिंदी माध्यमाचाच पर्याय असल्याने केंद्रीय विद्यालये आणि हिंदी, इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी सहभागी होऊन जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळांतील सर्वसामान्य विद्यार्थी स्पर्धेपासून दूर राहू शकतात. यातून चुकीचा संदेश जातो. त्यामुळे या संदर्भात गांभीर्याने विचार करून बदल केला पाहिजे, असे मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

एनसीईआरटीतर्फे होणारी स्पर्धा देशपातळीवरील आहे. त्यात राज्य पातळीवरील विजेत्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड होते. एनसीईआरटीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषांचेच पर्याय आहेत. मात्र मराठी भाषेचाही समावेश करण्याची विनंती एनसीईआरटीला करण्यात येईल. लोकनृत्य स्पर्धेला भाषेचा अडसर नाही.

– डॉ. नेहा बेलसरे, उपसंचालक, एससीईआरटी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button