सीएनजीमध्ये पुन्हा दरवाढ

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) यांच्याकडून पुणे शहर, पिंपरी- चिंचवड, तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे
ही दरवाढ ८ एप्रिल आणि ९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. नवीन दरांनुसार, सीएनजीचा किरकोळ दर प्रतिकिलो ८९ रुपयांवरून ८९.७५ रुपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे घरगुती पीएनजीचा दर प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (एससीएम) ४९.९० वरून ५०.६५ रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना सीएनजीसाठी जादा दर द्यावे लागणार आहेत.
हेही वाचा – बनेश्वरच्या रस्त्यावरून अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले एका मिनिटात…
दरम्यान, मागील सहा महिन्यात वारंवार सीएनजी दर वाढत असल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्याने नागरिक सीएनजी वाहने खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
शहरात सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे तीन लाखांवर आहे. यात चारचाकी कारची संख्या सर्वाधिक आहे. यंदाच्या गुढीपाडव्यालाही सीएनजी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, सीएनजीच्या दरात देखील सातत्याने वाढ होत आहे. मागील सहा महिन्यांत जवळपास तीन ते साडेतीन रुपयांनी वाढ झाली आहे.