बनेश्वरच्या रस्त्यावरून अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले एका मिनिटात…

Ajit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील भोर येथील बनेश्वरच्या सहाशे मीटर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालया समोर काल (दि. ०९) उपोषण केले. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली. सुळे यांना पाच कोटींचा खासदार निधी मिळतो. खासदार निधीतून एका मिनिटात रस्त्याला मंजुरी देता येते, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.
अजित पवार पुढे म्हणाले की, भोरमधील बनेश्वरचा रास्ता केवळ सहाशे मीटर आहे. आमदार शंकर मांडेकर यांचा तो मतदारसंघ असून त्यांनी बनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न मांडला होता. मी इथला पालकमंत्री आहे. रस्ता फार मोठा नाही. हा रस्ता पीएमआरडीए, जिल्हा परिषद किंवा जिल्हा वार्षिकी योजनेमधून आपण करू, असे सांगितले. तो रस्ता मी करणार आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड महापालिकेला मिळाला “महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५” पुरस्कार
पुढे बोलताना म्हणाले, वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पुणे-मेट्रो निगडीवरून वाकड आणि चाकणपर्यंत नेण्यात येणार आहे. रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिंगरोडचे कामे सुरू आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही रिंगरोडचे काम हाती घेतले जाणार आहे. ज्यांच्या जमिनी जातात, त्यांना मोबदला दिला जाणार आहे, असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.
भोर तालुक्यातील बनेश्वर ते नसरापूर या दीड किलोमीटर रस्त्याची डागडुजी करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कडक उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तब्बल पाच ते सहा तासांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेकडून २ मेपासून या रस्त्याचे काम सुरू केले जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.