गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनास पाठलाग करून पकडले, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे | ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची तस्करी करणार्या एका वाहनास पाठलाग करून पकडले. संबंधित वाहनामधील एकाला अटक केली असून त्याच्या ताब्यातून तीन लाख 75 हजार रुपये किमतीचा गांजा आणि ब्रिजा कार असा तबल 13 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुनील केदारी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबई-पुणे रस्त्याने कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना एका गाडीतून गांज्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी परिसरात सापळा रचून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवले असता पांढऱ्या रंगाची ब्रिजा कार आली. पोलिसांनी चालकाला थांबण्यास सांगितले असता त्याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून ही गाडी अडवली आणि गाडीची झडती घेतली असता गाडीत पोलिसांना 25 किलो गांजा सापडला.
दरम्यान गाडीच असणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरला तर दुसर्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी देखील दोन गुन्हे दाखल आहेत.