तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसह ‘सीडीएस’ यांची ‘एनडीए’त भेट; चौघेही एकाच तुकडीचे स्नातक
![CDS meeting with three army chiefs at NDA; All four are graduates of the same batch](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/New-Project-2022-10-22T151742.504-780x470.jpg)
पुणे : देशाच्या तिन्ही दलांसाठी शूर अधिकारी घडविणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) शुक्रवारी तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या एकत्रित भेटीचा योग जुळून आला. सैन्यदलाचे प्रमुख (सीडीएस) तसेच तिन्ही दलांचे विद्यमान प्रमुख हे प्रबोधिनीच्या एकाच तुकडीचे आहेत.देशाच्या तिन्ही दलांचे विद्यमान प्रमुख आणि नुकतेच झालेले देशाचे दुसरे सैन्यदल प्रमुख हे चौघेही प्रबोधिनीच्या १९७७ च्या तुकडीचे स्नातक आहेत.
या चौघांनीही प्रबोधिनीला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच येथील ‘हट ऑफ रिमेंमबरन्स’ येथे युद्धातील शहिदांना मानवंदना अर्पण केली.देशाचे दुसरे सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी हे एकाच तुकडीचे स्नातक आहेत.
या सर्वांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १९७७ तुकडीतून एकाच वेळी खडतर प्रशिक्षण घेऊन आपल्या सशस्त्र दलातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. सीडीएस आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांनी समन्वय सुधारणे आणि संयुक्तपणाला प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली.