जेजुरीत आरोग्य–विश्वशांतीसाठी भैरव–चंडी यज्ञहवन
लाखो भक्तांच्या उपस्थितीत दत्त भक्त परिवाराचा उपक्रम

पुरंदर | राज्यातील नामांकित तीर्थक्षेत्र जेजुरी खंडोबा गडावर रविवारी गुरुदेव दत्त भक्त परिवारातर्फे आरोग्य व विश्वशांतीसाठी भैरव–चंडी यज्ञहवनाचे आयोजन करण्यात आले. परमपूज्य गुरुवर्य अविनाश दादा बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या धार्मिक उपक्रमासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या लाखो अनुयायांनी उपस्थिती लावून गड परिसर दत्त व मल्हार नामस्मरणाने दुमदुमून गेला.
पहाटे भूपाळी आरतीनंतरच सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांची गडावर मोठी गर्दी झाली. खंडोबा मंदिराच्या रंगमहालात वैविध्यपूर्ण यज्ञसाहित्यासह भैरव–चंडी होमहवन सुस्थितीत पार पडले. या विधीत श्री मार्तंड देव संस्थांचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, माजी विश्वस्त संदीप घोणे, माजी नगराध्यक्षा अमृता पुणे, तसेच अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. खंडोबा देवाचे पुजारी महेश आगलावे आणि गणेश आगलावे यांनी पारंपरिक पद्धतीने विधी संपन्न केले.
हेही वाचा : श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवात भक्तांची मोठी गर्दी; सामूहिक अथर्वशीर्ष पठण, पवनामाईची आरती

“सध्याच्या जागतिक परिस्थितीत आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढत चालले असून निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटांमधून मार्ग काढण्यासाठी ईश्वरपूजन व धार्मिक आचरण महत्त्वाचे आहे. विश्व आरोग्य शांती आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने हा यज्ञ आयोजित केला,” असे दादाश्री बडगुजर यांनी सांगितले. तसेच संदीप घोणे यांनी खंडोबा परंपरेसंदर्भात विशेष माहिती दिली.
षष्ठीचा रविवार असल्याने जेजुरी गडावर हजारो भक्तांची गर्दी उसळली होती. येळकोट येळकोट जय मल्हार आणि गुरुदेव दत्त या गजरांनी वातावरण भक्तिमय झाले. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवर्य दादाश्री बडगुजर यांचे अनुयायी अभिरुची पारेख, पूनम राऊत, रूपाली आगलावे, प्रियंका कांचन, महेश आगलावे, निलेश तिवटे, वरद राऊत यांनी केले.
निसर्गात आणि मानवजातीमध्ये वाढत चाललेल्या अस्वस्थतेवर उपाय शोधायचा असेल, तर आध्यात्मिक साधना आणि ईश्वरचरणी शरण जाणे हाच खरा मार्ग आहे. विश्वाच्या कल्याणासाठी, आरोग्यसंपन्न जीवनासाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी सामूहिक श्रद्धा आणि यज्ञहवनाची शक्ती अनमोल आहे.
– परमपूज्य गुरुवर्य अविनाश बडगुजर.





