क्रिकेट सामन्यावर सट्टा , दोघांच्या विरोधात गुन्हा ; सॅलिसबरी पार्क परिसरात कारवाई
![Betting on cricket match, offense against both; Action in the Salisbury Park area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/cricket-betting-780x461.jpg)
क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९० हजारांचे दोन महागडे मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी हर्ष शैलेश पारेख (वय २२, रा. सॅलिसबरी पार्क, मार्केटयार्ड) आशय अवनिश शहा (वय २८, रा. सुजय गार्डन सोसयटी, स्वारगेट) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सॅलसबरी पार्क परिसरात भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर दोघे जण ऑनलाइन सट्टा घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.
मोबाइलद्वारे क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पाेलीस निरीक्षक अश्विनी पाटील, उपनिरीक्षक श्रीधर खडके, प्रमोद मोहिते, अण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे आदींनी ही कारवाई केली.