कॉपीमुक्त परीक्षांसाठी जनजागृती सप्ताह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/pune-26-780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षांसाठी २० ते २६ जानेवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे.राज्य मंडळातर्फे बारावीची ११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे.
दोन्ही परीक्षांमध्ये मिळून सुमारे ३१ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर, कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने निर्देश दिले आहेत.सध्याच्या पद्धतीनुसार परीक्षा केंद्रावर त्याच शाळांतील शिक्षक केंद्र संचालक, पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित काम करतात. मात्र, आता यात बदल करण्यात आला आहे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती अन्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमधून करण्याचे निर्देश राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी दिले आहेत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणप्रेमी सायकलस्वारांचा ‘‘कुंभमेळा’’
कॉपीमुक्त परीक्षांसाठी पुढील पाऊल टाकण्यात आले आहे. केंद्रसंचालक, पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित कर्मचारी अन्य शाळांतून नियुक्त करण्याचा निर्णय राज्यस्तरावरून पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्हास्तरावर, स्थानिक पातळीवर काही बदल करण्यात आले होते. आता राज्यभरातच बदल लागू होणार आहे.मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत तसेच शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली २० जानेवारी ते रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ या कालावधीत कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा :
त्यात २० जानेवारी रोजी कॉपीमुक्त अभियानाची शाळास्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक यांना माहिती देणे, २१ जानेवारीला कॉपीमुक्त अभियानाची शपथ, २२ जानेवारी रोजी कॉपी केल्यास होणाऱ्या शिक्षेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे, २३ जानेवारी रोजी परीक्षा काळातील आहार, आरोग्याच्या काळजीबाबत तज्ज्ञांद्वारे पालक, विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग, २४ जानेवारी रोजी तणावमुक्त वातावरणात परीक्षा देणे, उत्तरपत्रिका कशा लिहाव्यात या बाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन, २५ जानेवारी रोजी कॉपीमुक्त अभियानाबाबत जनजागृती फेरी, २६ जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.