गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्रखर बीम लाईट लावल्यास मंडळांवर होणार कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-45-1-780x470.jpg)
पुणे : पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये लेझर बीम लाईट, प्रखर बीम लाइटवर बंदी घालण्याचे आदेश सहपोलिस आयुक्तांनी यांनी दिले असताना वाघोली व परिसरातील गावांमध्ये दहीहंडी साजरी करणार्या मंडळांनी लेझर बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ४ आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्रखर बीम लाईट लावल्यास कारवाई होणार असल्याने मंडळांनी पोलिसांच्या आदेशाची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाढ यांनी दिली आहे.
हेही वाचा – विदर्भातील मुद्द्यावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर; भाजप नेते आशिष देशमुख यांचा आरोप
पुणे पोलिसांनी लेझर बीम लाइट वापरण्याबाबत ६० दिवस बंदी घातली आहे. तसे आदेश पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी काढले होते. तसेच कारवाईचा इशारादेखील दिला होता. असे असताना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहीहंडीत लेझर, प्रखर बीम लाईटचा वापर केल्याने ४ आयोजकांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
डोळ्यांना त्रास देणार्या या लेझर लाइटमुळे गेल्या वर्षीदेखील पुणेकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तसेच, गणेशोत्सवात यामुळे अनेकांना त्रासदेखील झाला होता. बंदीचे आदेश असताना देखील दहीहंडीत पोलिसांचे आदेश धुडकावून सर्रास लेझर, बीम लाइटचा वापर केल्याचे पाहायला मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर, बीम लाइटचा वापर झाल्यास पोलिसांकडून कारवाईचे संकेत मिळत असल्याने मंडळांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.