मारहाण प्रकरणात मिलिंद एकबोटे यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता
![Acquittal of eight persons including Milind Ekbote in assault case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/New-Project-2022-10-22T160116.115-780x470.jpg)
पौड रस्त्यावरील कोंडवाड्यात ठेवलेली जनावरे घेऊन जाण्यासाठी आलेल्या दोघांना मारहाण केल्याच्या आरोपातून मिलिंद एकबोटे यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. डाफरे यांनी दिले. १९ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला.
या प्रकरणात मिलिंद एकबोटे यांच्यासह हरिश्चंद्र शिवराम कोंढरे, हेमंत बबनराव बोरकर, बापू बबन काळे, प्रकाश नामदेव शेलार, राजेश बापूराव कोल्हापुरे, रामदास नारायण आंबेकर, पंडित परशुराम मोडक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोंडवाड्यात ठेवलेली जनावरे आणि गाई घेऊन जाण्यासाठी आलेल्या शकील कुरेशी आणि नासीर कुरेशी यांना जमावाने मारहाण केल्याची फिर्याद शकील कुरेशी यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात दिली होती. ४ जून २००३ रोजी ही घटना घडली होती.
या प्रकरणात न्यायालयात दोषाराेपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींच्या वतीने ॲड. महेश गजेंद्रगडकर, ॲड. एम. डी. झोडगे, ॲड. देशपांडे, ॲड. डोंगरे यांनी कामकाज पाहिले.या खटल्यात सरकारी वकिलांनी पाच साक्षीदार तपासले होते. खटला प्रलंबित असताना आरोपी मनोज रासगे यांचे निधन झाले. एकबोटे यांनी आरोपींशी संगमनत करून दंगा घातला. आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप सरकारी वकील सिद्ध करू शकले नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.