भोरच्या नवगुरु संस्थेतील ९० मुलींना जेवणानंतर विषबाधा
![90 girls of Bhor's Navguru Sanstha poisoned after meal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/College.jpeg)
पुणे | प्रतिनिधी
जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या खोपी येथे फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या परिसरात असलेल्या नवगुरु इन्स्टिट्यूटमधील तब्बल ९० मुलींना अन्नातून विषबाधा झाली आहे. यातील बहुतांश मुली या परराज्यातील आहेत. या मुली नवगुरु इंस्टिट्यूटमध्ये सॉफ्टवेअर प्रोफेशन प्रशिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विषबाधा झालेल्या ९० पैकी ७४ मुलींना किरकोळ उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, तर ८ मुलींवर भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच अन्य ८ मुलींची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विषबाधा झालेल्या सर्व मुली फ्लोरा कॅम्पसमध्ये वास्तव्यास असून त्यांची जेवणाची स्वतंत्र व्यवस्था आहे. रविवारी रात्री जेवण केले. जेवणामध्ये पनीरची भाजी, पुरी आणि भात असे जेवण त्यांनी स्वतःच तयार केले होते. मात्र रात्रीच्या जेवणानंतर सोमवारी सकाळी ४ ते ५ मुलींना पोटदुखीचा आणि उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला. मात्र त्याकडे त्यांनी गांभिर्याने पाहिले नाही. मग हळूहळू सोमवारी रात्रीपर्यंत इतर अनेक मुलींना त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी काल मंगळवारी उपचारासाठी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. भोरच्या ग्रामीण रुग्णालयात २२ मुली उपचारासाठी दाखल झाल्या. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
दरम्यान, सध्या विषबाधा झालेल्या सर्व मुलींच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तर विषबाधा नेमकी कशामुळे याचे कारण शोधण्यासाठी पाणी आणि अन्नाचे नमुने घेण्यात येणार आहेत.