आवास योजनेसाठी ४ हजार ६६६ जणांचे अर्ज

पुणे : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत शहरात दुसऱ्या टप्प्यात ४ हजार १७३ घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी, महापालिकेकडे आता पर्यंत ४ हजार ६६६ जणांचे अर्ज आले आहेत. या योजने अंतर्गत धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी तसेच वडगाव खुर्द या पाच ठिकाणी ही घरे बांधण्यात येणार आहेत.
शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पुणे महापालिकेने वडगाव बुद्रुक, खराडी तसेच हडपसर भागात यापूर्वी २ हजार ९१८ घरे बांधून त्याचे वितरण केले आहे.
हेही वाचा – बीएड महाविद्यालयांना चार हजार पुस्तके अनिवार्य
त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना २ ची घोषणा केली. त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढत या योजनेसाठी नागरिकांची घरांसाठी नोंदणी करण्याच्या सूचना महापालिकेला केली. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती.
आता महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली होती. ही नोंदणी ऑनलाइन पध्दतीने सुरू आहे. या योजने अंतर्गत नागरिकांना शहरात केवळ १२ ते १५ लाखांच्या आत घरे दिली जाणार आहेत. या योजनेत महापालिकेकडून मोफत जागा दिली जात आहे. तर, या घरांवर ९० टक्के कर्ज मिळत असून, पंतप्रधान आवास योजनेचे अनुदानही मिळते.