गॅस सिलिंडरच्या 25 स्फोटांनी हादरले पुणे शहर, वाचा काय घडलं?
![25 explosions of gas cylinder shook Pune city, read what happened?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Pune-Cylinder-Blas.jpg)
पुणे |
पुण्यातील कात्रज जवळील गंधर्व लॉन्स येथे सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाचच्या सुमारास गॅस सिलेंडरचे मोठे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटमुळे सदर गोडाऊनला आग भीषण लागली. या गोडाऊन मध्ये जवळपास वीस सिलेंडरचा स्फोट एकदाच झाल्याने आग चांगलीच भडकली; मात्र यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, गोडाऊनचा मालक सागर पाटील आणि त्याच्यासोबत एक इसम किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ दाखल झाल्या. यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी हा स्फोट मात्र भीषण होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेत गोडाऊनचे संपूर्णपणे नुकसान झाले असून या गोडाउनमध्ये अवैधरित्या सिलेंडर ठेवले असल्याची माहिती या घटनेनंतर समोर आली आहे. दरम्यान गोडाऊनच्या जवळच असलेल्या अनेक गाड्यांचे देखील या स्फोटामुळे नुकसान झाले आहे.