मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज १२ ते २ ब्लॉक, पाहा पर्यायी मार्ग
![12 to 2 blocks today on Mumbai-Pune Expressway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Mumbai-Pune-Expressway-1-780x470.jpg)
Mumbai-Pune Expressway | यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत पुणे ते मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर ग्रॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी या मार्गावर आज (२४ एप्रिल) दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. पुणे मुंबई महामार्गावर दुपारी १२ ते २ या वेळेत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ द्वारे देखरेख केलेल्या महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग म्हणून पुणे ते मुंबई वाहिनीवर १९.१०० किलोमीटर अंतरावर गॅन्ट्री बसवली जाईल. हे काम आज दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत केलं जाणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा वाहतूक ब्लॉक असेल. प्रवाशांनी वेळ पाहूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावं. गॅन्ट्री उभारण्याच्या प्रक्रियेदरम्यान, मुंबई वाहिनीवरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद असेल मात्र, सुरळीत प्रवास व्हावा यासाठी वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत.
हेही वाचा – ‘मतं द्या किंवा देऊ नका पण माझ्या अंत्यसंस्काराला जरूर या’; काँग्रेस नेत्याची भावनिक साद
द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी, डायव्हर्जन पॉइंट मुंबई वाहिनीवर ५५ लेन किलोमीटरवर असेल. ही वाहने मुंबईपुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८, खोपोली शहरातून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करून मुंबई वाहिनीमार्गे शेडुंग टोलनाक्यावरून पुढे जातील. एक्सप्रेसवे वरील आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकास करण्यासोबतच प्रवाशांची गैरसोय कमी करणे हा या डायव्हर्जनचा उद्देश आहे. त्यामुळे, महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुधारण्यासाठी, गॅन्ट्री बसवण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तात्पुरता वाहतूक ब्लॉक आवश्यक आहे.