मतदान व मतमोजणी परिसरात १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्र; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे | पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ दरम्यान शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार मतदान व मतमोजणीच्या ठिकाणापासून १०० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात मतदारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश बंदी असून मतदान केंद्रावर २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० पासून मतदान पूर्ण होईपर्यंत तर मतमोजणी केंद्रावर ०३ डिसेंबर रोजी सकाळी ६.०० वाजेपासून मतमोजणी संपेपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत.
हेही वाचा : सरकारने साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये; तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची पोस्ट
प्रतिबंधित परिघात वाणिज्यिक आस्थापना, मंडपे, दुकाने, फेरीवाले तसेच मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक व विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना मात्र सूट देण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम व भारतीय न्याय संहिता-२०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.





