हडपसरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा खून , तिघे ताब्यात
![Crime of killing goon Gajanan after his release from Taloja jail](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/crime7.jpg)
पुणे – दुसऱ्या गटातील मुलांसोबत का फिरतो या कारणावरून झालेल्या वादातून चौघांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाणी केली होती. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी परिसरास घडली.
प्रवीण रमेश नाईकनवरे (वय २४ , रा. फुरसुंगी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओमशा भंडारी, अभि माने, सनी बनसोडे, यांच्यासह एका साथीदाराविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रसाद राऊत (वय २३, फुरसुंगी) यानी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि ओमशा, अभि, सनी एकमेकांच्या ओळखीतले आहेत. यातील एका आरोपीचे काही दिवसांपूर्वी प्रवीणच्या मित्रासोबत वाद झाला होता. तेंव्हापासून प्रवीण त्याच्यासोबत फिरत होता. याचा राग आरोपींच्या मनात होता. आज दुपारी प्रसाद आणि प्रवीण हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी चौघांजणांच्या टोळक्याने प्रसादची दुचाकी अडविली. त्यांनी प्रवीणला भांडण झालेल्या तरूणासोबत का फिरतो असे म्हणत त्यांना बेदम मारहाण केली. यात प्रवीण गंभीर जखमी झाला होता.
या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी प्रवीणचा मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.