स्वारगेट चौकात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; एका महिलेचा मृत्यू
![Saraita dies after being beaten by retired police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Crime-1.jpg)
पुणे महाईन्यूज
स्वारगेट एसटी स्थानकासमोरील रस्त्यावर भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणीसह सहप्रवासी महिलेस गंभीर दुखापत झाली. दरम्यान, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेचा मृत्यु झाला.
ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. लॉकडाऊनच्या शक्यतेने खरेदी करून परतताना हा अपघात घडला. भारती अनंता शिर्के ( वय 55, रा. पर्वती दर्शन ) असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची भाची मयुरी तिके (वय 26) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी या फार्मसिस्ट आहेत. शहरात लॉकडाऊन लागण्याच्या शक्यतेने मयुरी व त्यांच्या आत्या भारती शिर्के या शुक्रवारी दुपारी घरगुती साहित्य व धान्य खरेदी करण्यासाठी महात्मा फुले मंडई परिसरात गेल्या होत्या. तेथून त्या दोघीही मयुरीच्या दुचाकीवरुन घरी परत येत होत्या. त्यांची दुचाकी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन स्वारगेट एस.टी स्थानकासमोरील उड्डाणपुलाजवळ आली, त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे, दोघीही गाडीवरून खाली पडल्या. या अपघातात भारती शिर्के यांना गंभीर दुखापत झाली, तर मयुरीला किरकोळ मार लागला.
स्थानिक नागरीक व कार्यकर्त्यांनी भारती यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली, त्याचबरोबर वाहतुक कोंडीही झाली होती. संबंधीत ठिकाणी वाहतुक सुरळीत व्हावी, यासाठी काही वर्षांपूर्वी उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र, तेथील वाहतुक कोंडीची समस्याही सुटली नाही, तसेच अपघातही घटले नसल्याची तक्रार स्थानिक नागरीकांनी केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश मोरे करीत आहेत.