स्मार्ट सिटीतील दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार
- अवैध धंद्यांना राजकीय अभय?
- पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार
पिंपरी- स्मार्ट सिटीअंतर्गत विकास साधण्यात येणा-या पिंपळे गुरव भागात दारू विक्री व मटका राजरोसपणे सुरू आहे. या अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे पोलीस कारवाई करण्यास धजावत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे अवैध धंदे बंद करण्यासाठी पिंपळे गुरव येथील 70 महिलांनी पुणे पोलीस आयुक्त रश्मि शुक्ला यांच्याकडे तक्रार केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणाची सुरूवात पिंपळे गुरव येथून होते. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे निवासस्थान आणि त्यांचे पक्ष कार्यालयही याच भागात आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास साधण्यासाठी पिंपळे गुरवचा समावेश केला. या भागामध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याने येथील महिलांनी याच्या विरोधात राजकीय नेत्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, हे अवैध धंदे बंद करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे येथील सुमारे 70 महिलांनी दारू विक्री आणि मटका धंद्यांच्या विरोधात पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रारीवर महिलांनी स्वक्षरी देखील केली आहे.
या भागामध्ये अनधिकृत बांधकामांची संख्या मोठी आहे. पालिका प्रशासनाकडे याची तक्रार केली. मात्र, प्रशासनाने बांधकामांवरील कारवाई थांबविली. आता अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे पोलीस कारवाई करण्याचे धाडस दाखवित नाहीत. त्यामुळे स्मार्ट सिटीत समाविष्ट झालेल्या पिंपळे गुरवचा विकास कसा साधला जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक