साहित्यसंमेलन संपल्यावर राष्ट्रवादीचे आंदोलन

- पालकमंत्री मदन येरावार यांचा राजीनामा घेण्याची मागणी
‘साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्यासाठी राजकीय दबाव आणणारे पालकमंत्री मदन येरावार यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा’ या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे साहित्यसंमेलन संपल्यानंतर सोमवारी आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याऐवजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केल्यामुळे राजकीय वर्तुळात हे आंदोलन चर्चेचा विषय झाले.
यवतमाळ येथे झालेल्या साहित्यसंमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करावे यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री मदन येरावार यांनी दबाव आणून संमेलनाच्या आर्थिक नाडय़ा आवळण्याची धमकीही दिली होती, असा खळबळजनक आरोप साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केला. त्याचा आधार घेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात प्रदीप देशमुख, मनाली भिलारे, गणेश नलावडे यांच्यासह ३६ कार्यकर्ते सहभागी झाले होते.
साहित्य शारदेचा उत्सव शांततेमध्ये पार पडावा या उद्देशातून संमेलन संपल्यानंतरच हे आंदोलन करण्यात आले असल्याचा दावा चेतन तुपे यांनी केला. संमेलनामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असले तरी येरावार यांच्या कृतीमुळे शासनाचे नाक कापले गेले आहे. त्यामुळे साहित्यसंमेलनाला उपस्थित राहण्याऐवजी मुख्यमंत्री पुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीस उपस्थित होते, असा आरोपही तुपे यांनी केला.





